Saturday, April 21, 2018

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल


अहमदनगर (कोकमठाण)कार्यप्रेरणा परिषद

🏆 *नगरची कार्यप्रेरणा परिषद* 🏆

🌋 *आधी केले..मग सांगितले*!🌋
🎯.. *चाललो आम्ही प्रगत च्या दिशेने*!
🏇🏇🏇🏇🏇

दि. २६ सप्टे. २०१६ सोमवार कोपरगावातील कोकमठाण येथून !

     मोठया आनंदाच्या अन उत्साहाच्या  वातावरणामध्ये पार पडलेल्या कार्यप्रेरणा परिषदेचा  *अनुभलेला वृत्तांत* जसा आठवला तसा !

      *संधी साधू* च्या जमान्यात चांगल्या माणसानं पुढं आलं पाहिजे... आपलं काम इतरांनां दाखवलं पाहिजे .. *जग बदलतंय आपणंही थोडं बदललं पाहिजे* .. असं सांगून चांगलं काम करणाऱ्या माणसांना नेहमी चांगल्या *संधी* मिळतात अन मिळालेल्या संधीचं नेहमी सोनं करावं असा *परीस- मंत्र* सांगणारे नगर जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्रा.) मा. श्री. अशोक कडूस साहेब यांनी कोपरगाव शिक्षण विभागावर  जिल्हास्तर परिषद घेण्याचा *विश्वास* दाखवला अन तुम्ही छान करु शकता असा *आत्मविश्वास* देवून तयारीला लागा अशा सुचना केल्या.इतकंच सांगून साहेब थांबले नाही तर त्यासाठी मदत , मार्गदर्शन करण्यासाठी राहुरीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम.पटारे मॅडम व अनुभवी विस्तार अधिकारी वाकचौरे साहेब यांनाही आवश्यक सुचना केल्या.
     त्यानुसार  राहूरीच्या  ग.शि.अ.मा. श्रीम.पटारे मॅडम, आम्हा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे बापू आदरणीय डी.डी. वाघचौरे साहेब, व कोपरगावच्या प्र. ग. शि. अ. शबाना शेख या त्रिमुर्तींच्या कल्पकतेतून , मार्गदर्शनातून आणि नियोजनातून कोकमठाणच्या आत्मा मालिकच्या महादेवी हॉल मध्ये २६ सप्टे. २०१६ ची कार्यप्रेरणा परिषद संपन्न झाली.

 ज्यांच्यासाठी आपण हे सर्व काही  करतो आहोत त्या विदयार्थ्यांच्या सादरीकरणापासून परिषदेची सुरवात करण्याचा उद्देश फक्त आणि फक्त *जाणिवेची जाणिव* निर्माण करणं हाच होता.

साध्या.. सोप्या.. सरळ शब्दातील प्रास्ताविकातून  मा. कडूस साहेबांनी कार्यप्रेरकांसमोर अहमदनगरची पी.एस.एम.बाबत पार्श्वभूमी मांडली जी कार्यप्रेरकांच्या टीमला देखील परिषद यशस्वी करण्यासाठी पूरक ठरली.. तसंच साहेबांना दाखवण्यासाठी नव्हे तर आत्मीक समाधानासाठी काम करा असं आवाहनही या वेळी कडूस साहेबांनी उपस्थितांना केलं.

आजच्या परिषदेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आदर्शवादापेक्षा *वास्तववाद* आणि *कार्यवाद* यावर भर.. काय करणार? .. काय असावं?.. कसं असावं?  यापेक्षा *काय केलं अन कसं केलं*.. ते करताना *अडचणी* काय आल्या अन त्या *कशा सोडवल्या* यावरच फक्त फोकस !
एक प्रकारे बाप दाखव नाही तर श्राध्द घाल... असंच काही बोललं तर ते वावगं ठरू नये... जे केलंय तेच दाखवता येतं ! नुसतं फेकायचं अन समोरच्यानं गुंडाळायचं असा काळ नाही राहिला आता ! आज परिषदेत  प्रत्येक नाणं ( सादरकर्ता ) खणखणीत होतं.

*जिवंत माणुसंच  जिवंत माणसांच्या अंगावर शहारा आणू शकतो* .. रोमांच निर्माण करू शकतो हे *भावनिकतेचा मास्टर माईंड* कार्यप्रेरक दादासाहेब नवपुते या गुरुजींना ऐकताना आम्ही अनुभवत होतो.

दादांनी एक साधा *चेंडू* आणि  तीन - साडेतीन *फुट दोरी*च्या मदतीनं गंजत चाललेल्या मानसिकतेला दुरुस्त करण्यासाठी.. डोक्याला *झिणझिण्या आणणारं वास्तव* उभं केलं ... नुसतं *वास्तव* मांडलं नाही तर त्याला *तोडगा* सुद्धा सांगितला.
दादांनी मुल समजून घेताना मी बदललं पाहिजे.. मी बदललो तर जग बदलेल हे पोटतिडकीने सांगताना *आजारी विदयार्थ्याच्या घरी सदिच्छा* भेट उपक्रमात *पाच रुपयाचा बिस्कीट पुडा* सुध्दा क्रांती घडवून आणू शकतो हे दाखवून दिलं..  मुलांसमवेत जेवा.. मुलांच्या आवडी निवडी जपा.. *वाटाण्याची बेरीज* अन *वजाबाकीतून हरबरे* असे साधे साधे उपक्रम सुचवून सर्वांना रोमांचित अन प्रेरित सुध्दा केलं.

*श्री.प्रकाश कांबळे* .. दुसरे कार्यप्रेरक.. वय वर्षे ५४.. चार वेळेस ओपन हार्ट सर्जरी.. दुर्गम भागात नोकरी.. कुठं वर्धा .. कुठं औरंगाबाद ..बीड.. अन आज कोपरगाव.. प्रचंड प्रवास.. *प्रचंड ऊर्जा.. अन उत्साह*.. ! डिस्कवरी चॅनेलने नोंद✍ घेतली या माणसाची मी काय लिहीणार या माणसाबद्दल !  स्वतःच्या खिशातून तीन लाख रुपये शाळेला खर्च करणाऱ्या या माणसाच्या कार्याला सलाम💐🙏 !

     तिसरं व्यक्तिमत्व *श्री. रमेश ठाकूर* ! अगोदर शिक्षकांचा मित्र अन नंतर विस्तार अधिकारी ! *खुर्चीवरुन फरचीवर* बसणारा.. जीव तोडून काम करू नका तर *जीव जोडून काम करा* असं सांगणारा.. *दीड* घंटयांचा संदेश *दीड* मिनटाच्या बदकाच्या पिलांची क्लिप मधून सांगणारा .. अधिकारी.. सर्वांनाच भावलेला माणुस ! पी.एस.एम. चा साधा सोपा अर्थ ज्या सरळ पध्दतीनं त्यांनी मांडला तो काळजाला भिडणारा होता. *मुले* ऐवजी *मुल*. हा *मुल मंत्र* सांगताना मला काय करायचं? का करायचं ?अन आहे त्या परिस्थितीत उत्कृष्ट कसं करु ही *त्रिसुत्रीही* मांडली.

अधिकारी - शिक्षक यांच्यातील *भीती*..  तिचा परिणाम शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील भितीवर.. तिचा परिणाम विदयार्थी अन अभ्यास यांच्यातील भितीवर .. या अनिस्ट भिती चक्रातील दोन घटका दरम्यानची *भितीची भिंत* जर पाडली तर आपोआप *गुणवत्तेचं मंदिर* निर्माण होईल हेच ठाकूर सरांच्या व्यक्तिमत्वातून दिसलं! ठाकूर आडनावाची  माणसंच ग्रेट👌 !

आजच्या परिषदेच्या कार्यप्रेरकांच्या लिडर नेवासाच्या गटशिक्षण अधिकारी  *श्रीम.साईलता सामलेटी* लिडर या पदाला खरोखरच शोभत होत्या.. अन त्याप्रमाणं न्यायही देत होत्या.. नम्रता हा त्यांचा दागिना वाटला.. असंख्य पुस्तकात वाचलेलं यशाचं *श्रेय इतरांना दया .. अन मोठे व्हा* ! हा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक कृतीतून ..बोलण्यातून दिसत होता.. ! त्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय हे त्यांच्या पूर्ण टिमला दिलं.. टिमकडूनही खूप शिकायला मिळालं असं सांगून यशाचं हे रहस्य सांगताना कॉपी करु नका, ईतरांना मदत ही स्वतःला मदत , *चोरी मधाची होईल पण गुणवत्तेची मुळीच नाही* या आशयाच्या प्रेरणादायी बाबी यावेळी शेअर केल्या.

   खरं तर आमच्या जिल्हयातून   काहीतरी  घेवून जाण्यासाठी बाहेरुन (वर्धा, औरंगाबाद ) आलेली ही *प्रेरक मंडळी* आम्हालाच  खूप काही देवून गेली !

जिल्हयातील विक्रम अडसूळ यांच्या बंडगर वस्ती शाळेचा *ए.टी.एम.* उपक्रम, केंद्र प्रमुख रामदास मोरे यांचं दुष्काळी भागात *आय.एस.ओ*., *ध्येयवेडे* ज्ञानेश्वर इंगळे सरांची स्वप्नातील शाळा, *शिक्षकांप्रती तळमळ* असलेले केंद्र प्रमुख लक्ष्मीकांत देशमुख यांचं शिक्षकांनी वाचलं पाहिजे,  *अॅक्टीव* विस्तार अधिकारी (शि) श्री. संभाजी झावरे यांनी बिटाची प्रगती -सांख्यिकी आधार , तर कोपरगावच्या गटशिक्षण अधिकारी श्रीम.शबाना शेख यांनी पी.एस.एम. साठी राबवलेले उपक्रम,केलेले नियोजन, अंमलबजावणी इ. बाबींवर प्रकाश टाकून प्रेरणा निर्माण केली.
     खरं तर आजच्या परिषदेचं इतिवृत्त लिहिण्यासाठी श्री. खैरे, श्री. खरात व श्री. गोसावी यांना सांगितले पण ते परिषदेतील वातावरणात इतके *इनव्हॉल्व* झाले होते की त्यामुळे ते लिहू शकले नाही. *देहभान हरपून जाणे* म्हणजे तरी दुसरे काय..?ते ही या निमित्ताने पहायला मिळाले.तीच *यशस्वीतेची पावती* !

      बोलण्यासाठी संधी मिळाली की त्याचंही सोनं करणारी माणसं असतात पण *संधी* नावाखाली *हौस* नावाचं पिक येवू नये म्हणून नियोजनात घंटी  (बेल)🔔 नावाचं *प्रतिजैवक* वापरलं गेलं म्हणून घंटींला 🔔आवर्जुन धन्यवाद 🙏लिहावेच लागतील ! सांगण्याचं तात्पर्य *सुक्ष्म नियोजनाचा* तो एक भाग ! यशस्वीतेचं श्रेयाचा आणखी एक मानकरी .. सर्वाना सर्व काही मनापासून सांगणारा .. दाखवणारा एल.ई.डी. ! शेवटचा  *कोपरा* देखील ठेवला त्यानं *हसरा*.

 सक्रीय, उपक्रमशील शिक्षक *भाऊसाहेब चासकर, संदीप वाकचौरे सर* यांच्यासारखे सभेला दोन -दोन तास खिळवून ठेवणारे गुरुजी तसेच शिक्षण क्षेत्राचा  व्यासंग अन प्रशासनाचा प्रदिर्घ अनुभव असणारे मा.गट शिक्षण अधिकारी श्री. *हराळ साहेब*, श्री. *पावसेसाहेब*... शेवगावचे श्री. बुगे साहेब.. रहाता बी.ई.ओ. शिवगुंडे  मॅडम , संगमनेरचे आर.एम. गायकवाड, पाथर्डीचे कराड बंधू ..यांनीही आजच्या परिषदेतील सर्व सादर कर्त्यांना *मनापासून दाद* दिली व त्यांचे *अभिनंदन* करुन *कौतूकही* केले..  *नवनविन हिरे शोधणे.. अन त्यांना पैलू पाडणे* ..  ज्ञानाचा कौशल्याचा वारसा *संवर्धन व संक्रमण* असाच उद्देश यापुढील काळात परिषदांचा राहील असे वाटते.
   परिषदेत आत्मा मालिक कुलातील प्राचार्य डांगे सरांनी आपल्या मधुर वाणीनं कुलातील मराठी माध्यमाची स्पर्धा .. गौरवपुर्ण इतिहास व वर्तमान चा आलेख मांडून आम्ही उपक्रम  सांगून आमचं *सिक्रेट* सांगत नाही तर *रिझल्ट देतो* असं सांगून यशाचं रहस्य खुलं करुन गेले अन *प्रेरणाही* देऊन गेले.

सकाळचा ९ चा नाष्टा.. दोन वेळचा चहा .. दुपारचं दीडचं जेवणं.. डायटच्या श्रीम.निशीगंधा चौधरी यांनी कार्यप्रेरक व सादरीकरण केलेल्या व्यक्तींचा पुस्तक देवून  ते करत असलेल्या कामाचा गौरव व मार्गदर्शन .. तसंच प्रत्येकानं विचारपिठावरुन उत्तम काम करणाऱ्या व *धडपडणाऱ्या व्यक्तिंचा नामोल्लेख करुन केलेला सन्मान*.. प्रातिनिधिक स्वरुपात आदर्श गुरुजी संदीप वाकचौरे यांचा सत्कार आदी घटना सुध्दा प्रेरक होत्या.

    परिषदेस जिल्हातील सर्व तालूक्यातून गट शिक्षणाधिकारी, मुख्यालयाचे व तालूक्याचे सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख , शिक्षक, सर्व बी.आर.सी.  चे विषय तज्ञ ,मोठया संख्येने व पुर्णवेळ उपस्थित होते. सदैव काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लोकप्रतिनिधी ..पं.स. कोपरगावचे सभापती मा.श्री. सुनिलराव देवकर यांची उपस्थिती आम्हाला आमच्या कामाची पावती देऊन गेली.

५.३० वाजेपर्यंत चाललेल्या परिषदेत गीतगायन जि.प. सोनेवाडी च्या विदयार्थ्यांनी केले..व माने  सरांच्या गीत मंचाने मनं जिंकली.. उत्कृष्ट सुत्रसंचलन करणारे श्री. कहांडळसर , त्यांना सहकार्य करणारे फैय्याज पठाण सर.. तसेच उपस्थितांचे ऋण व्यक्त करताना  श्री.डी.डी. वाकचौरे साहेबांनी  दिवसभर उभे राहून तत्पर सेवा देणाऱ्या  कर्मचारी, तंत्र स्नेही शिक्षक व पडदयामागील सर्वांचा उल्लेख करुन *गौरव* केला व उपस्थित सर्वांचे आभार मानले.

        राज्यात सुरु असलेल्या प्रेरणा परिषदेसाठी *नगर जिल्हयाला* मिळालेल्या *कार्यप्रेरक टीमची* वरिष्ठ व एस.सी.ई.आर.टी. यांनी  विशेष नोंद घ्यावी ही *विनंती*. ! या टिम बरोबर जो चव्हाण                 आडनावाचे ड्रायव्हर...  एका रात्रीच्या मुक्कामाच्या निमित्ताने एका चांगल्या मित्राची.. माणसातल्या *एका चांगल्या माणसाची* ओळख झाली. हा *माणुस निवडताना* एस.सी.ई.आर.टी. ने घेतलेली  दक्षता ही सुध्दा एक प्रेरक आणि वैशिष्ट्यपुर्ण बाब ! नेहमीच *नंबर वन* राहणाऱ्या नगरकरांना नंबर वन साठी शुभेच्छा !💐💐💐
     
   चांगला शर्ट शिवताना नक्कीच चिंध्या सुध्दा पडतात तसं हे सगळं करताना काही उणिवां देखिल नक्कीच राहिल्या असतील कार्यक्रमात अन लिहिताना सुध्दा  यात शंका नाही. त्या बद्दल क्षमस्व व दिलगिरी🙏  ..पण नेक्स टाईम त्या चिंध्यांचं *उशी* नाही तर किमान *डस्टर* शिवण्यासाठी तरी त्याचा नक्कीच उपयोग होईल या आशावादासह सर्वाना पुनश्च शुभेच्छा.💐💐💐

✍✍✍
*शंकर आ. गाडेकर*
विस्तार अधिकारी (शिक्षण)
पंचायत समिती , कोपरगाव

*प्रेरणा व मार्गदर्शन*
श्रीम.शबाना शेख
प्र.गट शिक्षण अधिकारी
पंचायत समिती, कोपरगाव
📕📓📗📘📙📔📒🖍
दिनांक 16 एप्रिल 2018 रोजी तालुका स्तरीय शाळा व्यवस्थापन सदस्य सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित केली होती .यावेळी माझ्या शाळेचा रचनावाद व तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात वापर या विषयावरील स्टॉल लावला होता.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यानी मान्यवरांना विविध शैक्षणिक ऍप्स व साहित्याविषयी माहिती सांगितली.





Thursday, October 5, 2017

*स्पेशल डे.. स्पेशल डिश..*

    *चिकन बिर्याणी*
🥘🥘🥘🥘🥘🥘🥘

बऱ्याच दिवसापासूनची मुलांची इच्छा आज पूर्ण झाली.
आज जि.प.प्राथ.शाळा बंडगरवस्ती येथे दुपारच्या शालेय पोषण आहारामध्ये *चिकन बिर्याणीचा* बेत केला होता.
सकाळीच शाळेत येताना तालुक्याच्या ठिकाणाहून चिकन व इतर साहित्य घेतले.कविता मॅडम यांना कल्पना दिली .मी शाळेत जाईपर्यंत कविता मॅडम आणि बालचमूने बिर्याणीची पूर्वतयारी करून ठेवली होती.या कामी  बिर्याणी पाककलेत माहीर असलेल्या हंडाळवाडी येथील अंगणवाडी ताई निलोफर शेख मॅडम मदतीला धावून आल्या अन मग काय बिर्याणीची प्रत्येक्ष कृती सुरू झाली.
शालेय परिसरात सर्वत्र फोडणीचा घमघमाट..

छान बेत झाला

*पुढील डिश लवकरच..*

Saturday, October 8, 2016

फडक्यातली भाकरी...

*फडक्यातील भाकरी*
🍪🍪🍪🍪🍪🍪

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

काल दुपारची जेवणाची सुट्टी.
आम्ही नेहमीप्रमाणे सर्व मुले व मी एकत्र शाळेच्या व्हरांड्यात जेवणासाठी बसलो होतो.सर्वांनी आपापला डबा उघडून जेवायला सुरुवात केली सोबत पोषण आहार ही होता
चौथीच्या वर्गातील प्रतिक्षाने डब्यात बाजरीची भाकरी आणलेली पण ती जेवणा डब्याशी कसलीतरी झटापट चालू होती तिची ..
मी न राहवून विचारले काय झाले मग तिच्या शेजारी बसलेल्या दीपाली ने सांगितले
*सर ...*
*तिच्या डब्यातून भाकरी निगत नाय..*
मग मी म्हणालो बघू मी काढून देतो ..मलाही डब्यातील भाकरी निघेना...😔😔
कारण ही तसेच होते
भाकरी डब्यात इतकी फिट्ट बसली होती की हाताने निघेना
मग आम्ही शाळेतील भातवडीचा वापर करून डब्यातील भाकरी काढली..
मला ही बाजरीची भाकरी पाहून खाण्याचा मोह आवरला नाही. कारण ही तसेच..
 सध्या खरिपाची पिके निघाली आहेत नवीन बाजरी झाली आहे ..अन मीठ टाकून बनवलेली बाजरीची खाण्यात मजा काही औरच असते.
मग आमच्या बाजरीच्या भाकरीवर खूप गप्पा झाल्या.
भाकरी कशी बनवली पाहिजे,भाकरीसोबत काय छान लागते...असे बरेच काही..
मी काल बोलता बोलता बोलून गेलो होतो की डब्यात भाकरी कडक राहत नाही ती चिकटते या साठी फडक्यात बांधून आणलेली भाकरी कडक राहते व चवीला हि छान लागते..
*मी लहान असताना माझी आई मला फडक्यात भाकरी बांधून द्यायची असं खूप काही बोललो*
*लहानपणीच्या माझ्या बालआठवणी जेवण करताना मुलांना सांगितल्या*

*अन आज.....*

दुपारी जेवणाची सुट्टी झाली मी प्रश्नार्थी  शब्द हे शैक्षणिक साहित्य बनवत होतो काम चालूच होते.मुलांना जेवायला बसा सांगितले मी येतोच असं म्हणून.पण कामामुळे 5 मिनिट झाले तरी लक्षात नाही आले की जेवायचे

दीपाली दरवाज्यापाशी घुटमळत होती म्हणून मी तिला थोडं मोठ्या आवाजतच बोललो ..
जा बस कि जेवायला ...
पण ती जाईना..
मग मी विचारले का जेवणास तेव्हा तिने जे उत्तर दिले त्या उत्तराने माझ्या हातातील काम आपोआप बंद पडले आणि मी खुर्चीवरून ताडकन उठलो....
माहितेय तिने काय सांगितले

*स चला ना जेवायला*
*मी फडक्यात बाजरीची अन मिरचीची ठेचा आणलाय..*

खरच क्षणभर विचारात पडलो
लेकरं किती जीव लावतात आपल्याला,
किती प्रेम करतात,
किती आत्मीयता असते मुलांची आपल्याशी,
क्षणभर तृप्तीताई समोर उभ्या राहिल्या अन त्यांचा शब्द आठवला ....
*सर्वात प्रथम प्रत्येक शिक्षकाने मूल समजून घेतले पाहिजे*
खरंच मूले फार जीव लावतात आपल्याला..

*आजचे जेवण खरच इतके चविष्ट होते की पंचपक्वांन ही या माझ्या दीपालीने  आणलेल्या फडक्यातील भाकरीपुढे फिके ठरले असते*

आजचा दिवस खूप काही  शिकवून गेला
🙏🙏🙏🙏🙏

कर्जत तालुकास्तरीय शिक्षण परिषद

*शिक्षण परिषद*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्र स्तरावर शिक्षण परिषद घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज *दि.17 सप्टेंबर 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा. अशोक कडूस साहेब तसेच उपशिक्षणाधिकारी अंकुश जंजिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील केंद्र स्तरावरील शिक्षण परिषद पार पडल्या.*
*याचाच एक भाग म्हणून कर्जत तालुक्यातील सर्व केंद्रातील शिक्षण परिषद मा. गटशिक्षणाधिकारी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या.*
या परिषदेमध्ये केंद्रातील ज्या शिक्षकांचे प्रगत वर्ग आहेत,प्रगत शाळा  आहेत ,तसेच ज्या शिक्षकांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे अश्या शिक्षकांनी आपल्या शाळेचे सादरीकरण व्हिडीओ,पीपीटी यांच्या साहाय्याने केले.यावेळी सम्पूर्ण वातावरण सकारात्मक झालेलं दिसून आले.

*राशिन केंद्राच्या परिषदेमध्ये आदरणीय शिक्षण आयुक्त मा. धीरज कुमार साहेब व मा. शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांनी मोबाईल फोन वरून शिक्षकांशी संवाद साधला व एकंदरीत परीषदेचा  आढावा घेतला .आदरणीय साहेबांच्या या फोन संदेशा मुळे प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून येत होते.*

*यानंतर कोरेगाव केंद्रातील शिक्षण परिषदेमध्ये महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी असणारा ..स्फूर्तीचा अखंड झरा..आधुनिक सावित्रीमाई लातूरच्या गटशिक्षणाधिकारी आदरणीय मा.तृप्ती अंधारे यांनी फोन द्वावारे शिक्षकांशी संवाद साधला.*एकंदरीतच आज संपूर्ण कर्जत तालुका शिक्षणमय झालेला दिसून आला.
प्रत्येक शिक्षक आपण करत असलेले काम इतरांना समजून सांगत होता,आपल्या यशाचे गमक सांगत होता,तसेच स्वतः ची शाळा प्रगत करण्यासाठी ,समृद्ध करण्यासाठी कोणत्या अडचणी आल्या हे हि सांगत होता.यातून प्रत्येक  शिक्षकाला नवीन दिशा मिळत होती.
आज एकंदरीतच प्रत्येक शिक्षक माझ्या शाळेतील प्रत्येक मुल शिकलं पाहिजे यासाठी काय करता येईल हे एकमेकांना सांगत होता

आजचे आदरणीय मान्यवरांचे फोनवरील मार्गदर्शन,शिक्षकांशी साधलेला संवाद खूपच प्रेरणादायी ,सकारात्मक ऊर्जा देऊन गेला.

आजची ही शिक्षण परिषद पार पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी,उपक्रमशील शिक्षक व कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. शिंदे साहेब या सर्वांनी परिश्रम घेतले

*मी एक शिक्षक म्हणून मला काही केंद्रामध्ये माझ्या शाळेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली ,माझ्या शाळेचे काम मला सादर करता आले हे मी माझे भाग्य समजतो.*

खरच केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदेचे आयोजन हा शासनाने घेतलेला स्तुत्य उपक्रम... असेच मी तर माझ्या शब्दात वर्णन करेल...
🙏🙏🙏🙏🙏


*विक्रम अडसूळ*
*कर्जत ,अहमदनगर*

*9923715464*

💐💐💐💐💐💐

Tuesday, August 2, 2016

पुणे विभागीय शिक्षण परिषद-बारामती

*बारामती शिक्षण परिषद*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*दि 24 व 25 जुलै 2015 या  कालावधीतअहमदनगर,सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यातील केंद्रप्रमुख,विस्ताराधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची दोन दिवशीय विभागीय कार्यशाळा पार पडली.वास्तविक पाहता यातील मी कसलाही* *प्रशासकीय अधिकारी नाही तरीही मला या कार्यशाळेस उपस्थित राहण्याची संधी शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब यांनी दिली त्याबद्दल साहेबांचे प्रथमतः आभार व धन्यवाद*
🙏🙏🙏🙏

पहिल्या दिवशी काही शाळा तसेच केंद्र स्तर व गटस्तरावरील सादरीकरण झाले ,प्रथम दिवशी *आदरणीय नामदेवराव जरग साहेब* दिवसभर कार्यशाळेसाठी उपस्थित होते.साहेबानी अगदी समर्पक असे प्रश्न विचारत सभागृह बोलते केले आणि प्रत्येक मुल शिकलं पाहिजे यासाठी आपण काय केले पाहिजे हे त्यांनी त्यांच्या समर्पक शब्दात सांगितले

त्याचबरोबर *आदरणीय दिनकर टेमकर साहेब* हे ही या परिषदेसाठी दोन दिवस उपस्थित होते,त्यांनी हि सभागृहाला योग्य असे मार्गदर्शन केले तसेच त्यांनी त्यांच्या सेवाकाळातील काही उदाहरणे देऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आलेल्या प्रसंगांना कसे सामोरे गेले हे त्यांनी सांगितले .आदरणीय साहेबानी दिलेल्या उदाहरनांपैकी नांदेड जिल्ह्यात गटशिक्षणाधिकारी असताना फोन वर घडलेला किस्सा सांगितला आणि सभागृहात एकच हस्या पिकला
आदरणीय साहेबानी या परिषदेसाठी फार कष्ट घेऊन परिषद यशस्वी केली

जिल्हास्तारावरील सादरीकरणात *आदरणीय अशोक कडूस (शिक्षणाधिकारी अहमदनगर)* *मुस्ताक शेख(शिक्षणाधिकारी* पुणे) ,घाटगे साहेब (शिक्षणाधिकारी सोलापूर)  तसेच डायट प्राचार्या मेटे मॅडम व औटें मॅडम यांनी सादरीकरण केले ,यामध्ये प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातील कार्याचा आढावा घेतला
आदरणीय कडूस साहेब यांनी माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक मूल शिकण्यासाठी काय केले ?
काय करत आहे ? पुढील दिशा समजावून सांगितली

 गटस्तरावरील सादरीकरणात
पंढरपूरच्या *गटशिक्षणाधिकारी *सुलभा वठारे मॅडम,नेवासा गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी मॅडम,* यांनी आपल्या कार्याचा आलेख सांगितलं तसेच पंढरपूर मधील दत्तक शाळा उपक्रम फारच सकारात्मक वाटला

तसेच नेवासा तालुका राजकीय व शिक्षक संघटनात्मक संवेदनशील असूनही एक महिला अधिकारी म्हणून करत असलेल्या कामाची पद्धत सर्वाना एक नवी उमेद देत होती

वाबळेवाडी व पावरवाडी या शाळेनी आपल्या शाळेचे सादरीकरण केले

दुसऱ्या दिवशी केंद्र स्तरावरील सादरीकरण झाले

पूर्णा तालुक्याचे *गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे साहेब* यांनी त्यांच्या खड्या आवाजातील मार्गदर्शनात काम कसे करावे व काम कश्यासाठी करायचे हे समजावून सांगितलं
शेवटी साहेबानी वामनदादा कर्डक यांची कविता गायन करून सभागृहामध्ये नवचैतन्य निर्माण केले
बऱ्याच दिवसाची साहेबांनी गायलेली कविता ऐकायची इच्छा पूर्ण झाली

त्याच बरोबर गेवराईचे विस्तार अधिकारी प्रेरणादायी व्यक्तिमत्व *काळम पाटील साहेब* यांनी त्यांनी लोकसहभाग कसा जमवला हे सांगून व काम कसे केले याविषयी मार्गदर्शन केले


अचानक सभागृहात प्रवेश झाला तो स्फूर्तीचा अखंड झरा असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील आधुनिक सावित्रीचा म्हणजेच..

*लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे* यांचा
तृप्ती ताईंनी अगदी मोजक्या शब्दात आपल्या कार्याची माहिती देऊन सभागृहातील सर्वाना काम करत रहा हे सांगितले

दुपारी एक वाजता आदरणीय
*शिक्षण संचालक नांदेडे साहेब व शिक्षण आयुक्त धीरज कुमार साहेब* आले
या मान्यवरांच्या समोर मला सादरीकरण करण्याची संधी मिळाली हे मी माझे
भाग्य समजतो

आदरणीय नांदेडे साहेब यांनी अगदी प्रेरणादायी शब्दात सम्पूर्ण सभागृहाला काम करण्याची प्रेरणा दिली,प्रत्येकाच्या मनामध्ये एक ऊर्जित अवस्था निर्माण केली
आभाळा एवढ्या उंचीचे व्यक्तिमत्व पण  कसलाही मी पणा नाही कि पदाचा गर्व नाही
साहेबांकडून खूप काही शिकता आले,साहेबानी मूल शिकलं पाहिजे याचे आवाहन केले

*शिक्षण आयुक्त धीरज कुमार साहेब* यांनी त्यांच्या शैलीमध्ये उपस्थित सभागृहाला  विविध उदाहरणाचा दाखल देत मार्गदर्शन केले यातील साहेबांचे रेल्वे ने प्रवास करणाऱ्या मुलगा वडील आणि गाडीतील सहप्रवाश्याचे उदाहरण देऊन लोकांच्या मनामध्ये नवचैत्यन निर्माण केले
*तसेच प्रगत मधील प्र म्हणजे*
*प्रेरणा ,प्रयत्न व प्रगती या* शब्दात वर्णन केले

या परिषदेसाठी आंग्लभाषा औरंगाबाद चे कांबळे साहेब ही दोन दिवस उपस्थित होते

या परिषदेच्या  नियोजनासाठी ज्यांनी मेहनत घेतली अश्या हवेलीच्या *गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार मॅडम* यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन

प्रत्येक परिसंवाद सादरीकरणाचे नियोजन अगदी सुंदर असे केले
त्याच बरोबर *संगीता शिंदे मॅडम* यांनी त्यांना छान अशी साथ दिली

तसेच पुण्याचे *उपशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे साहेब* व इंदापुरचे गटशिक्षणाधिकारी गुरव साहेब यांनी
 आपल्या अनुभवाच्या आधारे अतिशय कार्यकुशलतेने परिषदेचे आयोजन केले आणि नियोजनबद्ध पद्धतीने  अंमलबजावणी केली. आज पुन्हा त्याच्यातील  कुशलनेतृत्व दिसले.
एकंदरीतच ही दोन दिवशीय शिक्षण परिषद फारच सकारात्मक झाली.या दोन दिवसात खूप काही शिकता आले

*ही परिषद माझ्यासाठी खुप प्रेरणादायी ठरली कारण आपण करत असल्या कामाची पावती आज मिळाली*


यापेक्षा वेगळा काय आनंद असू शकतो
🙏🙏🙏🙏🙏

*विक्रम अडसूळ*
*कर्जत अहमदनगर*
*मोबा.9923715464*

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल